अन्नपूर्णा

२००६, जून महिन्याची ९/१० तारीख, पावसाला तशी सुरुवात झाली नव्हती, तुरळक पावसाने थोड फार गवत उगवलेल होत, इतकच. आम्ही, ८ जणांनी जुन्नर भागातले हडसर आणि निमगिरी किल्ले करण्याचा बेत आखला. सकाळीच ST ने निघून पायथ्याच्या गावाशी उतरलो आणि हडसर किल्ल्यावर चढलो. किल्ल्यावर चढल्यावर बरोबर आणलेलं जेवण केल आणि थोडा वेळ आराम करून संध्याकाळी किल्ला फिरून आलो. दिवसभर भरपूर उन होत, संध्यकाळी मात्र छान गार हवा होती. गडावर एकाच इमारत शिल्लक होती – महादेवाच मंदिर. त्याच्या समोरच तंबू ठोकून, मुक्काम केला. रात्री बरोबर आणलेलं अन्न शिजवून खालल. सकाळी उठून किल्ल्याची फेरी पूर्ण करून Maggi चा ‘brunch केला आणि किल्ल्यावरून खाली उतरलो. खाली उतरायला अपेक्षे पेक्षा जास्त वेळ लागला. आम्ही खाली उतरे पर्यंत १२.३० झाले.  खालच्या गावात पोहोचेपर्यंत सकाळची maggi पोटात कुठल्या-कुठे गेली होती. आम्हाला सगळ्यांनाच भुकेची जाणीव होऊ लागली होती. खालच्या गावात पोहोचून ST पकडून निमगिरीच्या पायथ्याशी पोहोचायचं आणि पटकन पोहे करून खायचे आणि निमगिरी करायचा, असा बेत होता. पण गावात पोहोचल्यावर कळल, एक ST नुकतीच गेली होती. पुढची ST तासाभराने येणार होती. निमागीरीच्या पायथ्याच गाव तिथून २५-३० किमी लांब होत. रणरणत्या उन्हात तिथे चालत निघालो असतो तर उरलेला दिवस त्यातच गेला असता, आणि किल्ला पण झाला नसता. त्यामुळे नाईलाजाने रस्त्याच्या बाजूला एका झाडाखाली, पुढच्या बसची वाट बघत बसलो.

तास होऊन गेला तरी बस आली नाही. दीड तास झाला तरी बस आली नाही. गावातले एक-दोन लोक बससाठी आलेले, आता काही बस येत नाही, म्हणून परत निघून गेले. आता पुढची बस अजून एक तासाने म्हणजे ३ वाजता होती. आम्हाला सगळ्यांनाच चांगलीच भूक लागली होती. एका तासात आमचं स्वयपाकाच साहित्य काढून परत आवरण्यात काही अर्थ नव्हता. आमच्याकडे पाणी पण फार नव्हत. स्वयंपाकाला आणि जेवणानंतर प्यायला पण खूप पाणी लागल असत. आमच्या पैकी काहींच म्हणण होत; तिथे कोणाकडे तरी पाण्याची कळशी मागून स्वयंपाक करून जेऊन घेऊ, यावर ५-१० मिनिटे प्रत्येकाच मत प्रदर्शनच चालू होत. ५ मिनिटांनी, आम्ही जिथे बसलो होतो, त्याच्या मागच्या झोपडी वजा घरातून एक बाई, एका टोपली मध्ये ६-७ भाकऱ्या, आमटी आणि दाण्याची चटणी घेऊन आली. आणि आमच्या पुढ्यात ठेऊन म्हणाली, “खावून ग्या, निमगिरीला जावून, बनवून खाईपर्यंत ४-४.३० होत्याल तुम्हाला”  आम्हाला आमच्या समोर अन्नपूर्णा उभी असल्या सारखं वाटलं.  आम्ही सगळे नको म्हणालो, तिचा तो संध्याकाळचा स्वयंपाक असणार. पण ती बाई काही ऐकायला तयार नाही. खूप आग्रह करू लागली. म्हणाली, – “माझ्या पोराला अस उपाशी पोटी पाटवलं असत का? तुमच पोट भरल एवढं नाईये पण थोड-थोड खावून ग्या. माजा मुलगा पण कामाला बाहेर गावी जातो, त्याला बी अशी मदत कोणी तरी करतच ना! तसंच!, खावून ग्या दोन दोन घास.”
त्या बाईला समजावण आम्हाला काही जमल नाही. तिने आम्हाला आग्रहाने जेऊ घातलंच. वरती पाण्याची कळशी पण आणून दिली; पाणी प्यायला आणि पुढच्या प्रवासासाठी पाणी भरून घ्यायला. ते पाणी तिने सकाळी अर्धा किमी चालत जाउन डोक्यावरून आणलेलं होत. आमच जेवण झाल्यावर थोड्याच वेळात आमची बस आली आम्ही तिचे मनापासून आभार मानून बस मध्ये चढलो. ४ वाजता निमगिरीला पोहोचलो आणि आमचा किल्ला पण पूर्ण झाला. आम्ही त्या बाईच्या आग्रहाने इतके कृत-कृत्य झालो की तिचं नाव पण विचारायचं विसरलो.

मनात आलं – कुठल्याच शहरात आम्हाला अस कोणी जेवायला घातलं नसत. इतरांनी तर नाहीच पण आम्ही – आमच्या घरच्यांनी पण कदाचित अस कोणाला जेवू घातलं नसत. ‘गावात माणुसकी टिकून आहे’ अस म्हणतात ते या साठीच.