औसा – उपेक्षित किल्ला

लातूर जिल्ह्यातील दोनच किल्ल्यांपैकी हा एक. लातूर पासून २० किमी वर असलेला हा किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात असूनही तसा उपेक्षितच आहे. लातूर जिल्हा सह्याद्रीच्या मुख्य रंगे पासून तसा बराच लांब. पण लातूरच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या बालाघाट रांगेचा काही पठारी भाग येतो. औसा हा किल्ला याच बालाघाट रांगेच्या पठारावर बांधलेला आहे.

औसा किल्ल्याच्या आजू-बाजूचा प्रदेश राष्ट्रकुटांच्या राज्याचा भाग होता. त्यानंतर बरीच शतके सातवाहन, शक, चालुक्यांनी आणि देवगिरीच्या यादवांनी या प्रदेशावर राज्य केले. यादवांनंतर उत्तरेतून आलेल्या बहामनी राजांच्या ताब्यात हा प्रदेश आला. बहामानीन नंतर काही काळ आदिलशाह, मुघल (औरंगजेब) आणि शेवटी शेवटी हा प्रदेश निजामाच्या राज्याचा भाग होता.

हा किल्ला कोणी बांधला याचा फारसा तपशील उपलब्ध नाही. मात्र किल्ल्याच्या बांधणी वरून, हा किल्ला मुस्लीम राज्य कर्त्यांनी बांधला असावा, किंवा त्याची थोडी फार पुनर्बांधणी तरी केली असावी हे लगेच ओळखता येते. भुईकोट बांधण्यात या शाह्यांचा हातखंडा होता. औसा हा भुईकोटांच्या उत्तम नमुन्यांपैकी एक आहे. किल्ला एकूण १३ एकरांवर बांधला असून किल्ल्या भोवती १२० फुट इतका रुंद खंदक खोदला आहे. भुईकोटांना अशा प्रकारच्या खंदकाचे खूप महत्व असते. खंदका मध्ये पाणी साठून राहण्यासाठी किल्ल्याच्या उताराकडील बाजूस बांध घालण्यात आला आहे. जेणे करून खंदक मध्ये पाणी साठून राहील व त्यामुळे शत्रूला किल्ल्याच्या जवळ पोहोचणे अवघड होईल, तसेच किल्ल्याच्या वापरला भरपूर पाणी उपलब्ध होईल. खंदक खोडून काढलेला सगळा दगड किल्ल्याच्या मजबूत तटबंदी साठी आणि आतील बांधकामासाठी वापरण्यात आला असावा. औसा किल्ल्याला भक्कम अशी दुहेरी तटबंदी आहे, तटबंदीमध्ये ३० बुरुज बांधण्यात आले आहेत. किल्ल्याचा दरवाजा प्रेक्षणीय आहे. शत्रूच्या सैन्याला सहजासहजी किल्ला जिंकता येऊ नये, व किल्ल्यात आल्यावर शत्रूच्या सैन्याची कोंडी करण्यासाठी, किल्ल्यात जाण्याच्या वक्राकार मार्गावर एका मागोमाग ४ दरवाजे बांधलेले आहेत. इतर भुईकोटां प्रमाणे या किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याच्या दोन बाजूला बुरुज नसून, वेगळ्या बांधणीचा आकर्षक दरवाजा आहे.

किल्ल्याच्या संरक्षणासाठी आणि शत्रूवर हल्ला चढवण्यासाठी आणलेल्या ३० पेक्षाही जास्त तोफा आजही किल्ल्यावर आहेत. ३० पैकी किमान २० तोफा तरी वेगवेगळ्या प्रकारच्या, जाडीच्या, रुंदीच्या आहेत. किल्ल्या इतक्याच त्या तोफापण प्रेक्षणीय आहेत. काही तोफांवर अरेबिक/फारसी मध्ये लेख लिहिलेले आहेत तर काही तोफांवर त्या युरोपातून आल्या असल्याचे पुरावे आहेत. किल्ल्याच्या आवारात वेगवेगळ्या आकाराचे बरेच तोफगोळे पण ठेवलेले आहेत. किल्ल्याच्या एका मोठ्या बुरुजावर शिलालेखामध्ये १५२९ साल उल्लेखिले आहे. बहुदा त्या वर्षी किल्ल्याचा जीर्णोदार केला असावा. किल्ल्याच्या आत २ मोठ्या विहिरी आणि काही इमारतींचे अवशेष आहेत. त्यापैकी मोठ्या विहिरी मध्ये १-२ माजले खाली उतरता येते. किल्ल्यात एक तळघर असून ती गुप्त चर्चेची खोली असल्याचे सांगितले जाते. किल्ल्यात भरपूर मोट्ठे वृक्ष असून झुडूप आणि वेलींचे रान माजले आहे. भरपूर झाडा-झुडूपांमुळे किल्ल्यात भरपूर मोर राहतात. किल्ल्यात फिरताना मोरांचे दर्शन सहज होते. किल्ला बघण्यासाठी किल्ल्याच्या तटबंदी वरून आणि किल्ल्याच्या आतून अशा २ फेऱ्या मारता येतात. संपूर्ण किल्ला बघण्यास तासभर पुरतो.

पुरातत्व खात्याने किल्ल्याच्या आत मध्ये कधी काळी बाग फुलवलेली होती आणि तिचेही अवशेष किल्ल्यामध्ये फिरताना दिसून येतात. किल्ला स्वच्छ आहे पण माजलेल्या झुडूपांमुळे किल्ल्याच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरता येत नाही. पुरातत्व खात्याने किल्ला संरक्षित स्मारक असल्याच्या पाट्या लावल्या आहेत, पण किल्ल्याची आणि इतिहासाची माहिती देणारी एकही पाटी आत मध्ये नाही. किल्ल्यामध्ये फोटो काढण्यास मनाई आहे. फोटो काढण्यासाठी पुरातत्व खाते – पुणे, इथून लेखी परवानगी घेऊन जावे लागते. पुरातत्व खात्याच्या अशा धोरणांमुळे औसा सारखे किल्ल्यांचे फोटो उपलब्ध होत नाहीत आणि त्यांची माहितीही कोणाला काळात नाही. वास्तविक पाहता त्या किल्ल्या मध्ये फोटो काढू न देण्या सारखं काही नाही. पर्यटकांसाठी किल्ला ९ ते ५ या वेळातच खुला असतो.

औसा पासून २०-२५ किमी वर खरोसा नावाच्या छोट्याश्या गावात जैन आणि हिंदू कोरीव लेण्या आहेत. ६व्या शतकात, गुप्तांच्या काळात कोरलेल्या एकूण १२ लेण्या आहेत. या लेण्यांमध्ये असलेली नरसिंह, शिव-पार्वती, कार्तिकेय आणि रावण यांची शिल्प अत्यंत सुंदर असून ती भारतीय सांस्कृतिक वारास्याचा उत्तम नमुना आहेत.